मुक्ताईनगर : प्रतिनिधी
बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मुक्ताईनगरहून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या बसवर समोरून भरधाव वेगाने आलेली रिक्षा आदळून चार जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात ते सव्वासात वाजेच्या दरम्यान घडली.
एमएच २० बीएल १६०३ या क्रमांकाची मुक्ताईनगर येथील बस सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान जळगाव जामोदकडे निघाली. बसमध्ये गर्दी होती. स्मशानभूमीजवळ बस असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाचा अंदाज घेऊन चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवून उभी केली. परंतु तरीसुद्धा रिक्षा क्रमांक (एमपी १२ आर ११५०) ही बसच्या समोरील बाजूस मधोमध धडकली. अपघातात रिक्षा चालक मिथून पंडित तायडे (रा. शहापूर, मध्यप्रदेश) बसमधील प्रवासी अंजनाबाई कांडेलकर (५०) तसेच सदर महिलेचा पती यांनाही खरचटले. तत्पूर्वी रिक्षा चालक पूर्णाड फाट्यावरून मुक्ताईनगरकडे येताना मोटारसायकलवरील प्रशांत रमेश पाटील (रा. सुकळी) व सविता रमेश पाटील (रा. सुकळी) दाम्पत्याला कट मारली, त्यात दुचाकीवरील दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान यातील प्रशांत पाटील, कविता पाटील (दोघे रा. सुकळी, ता. मुक्ताईनगर) व अंजनाबाई कांडेलकर (रा. चारठाणा) तसेच रिक्षाचालक मिथून तायडे यांच्यावर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अजिंक्य वराडे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर चौघांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.