भुसावळ : प्रतिनिधी
बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर येथील २५ वर्षीय तरुणाला पती-पत्नीने आपण बहीण-भाऊ असल्याचे भासविले आणि आपली बहीण अविवाहित असल्याचे सांगत एक लाख रुपये घेऊन स्वतःच्या पत्नीचे त्या तरुणाशी शुक्रवारी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.नोटरी पद्धतीने हा विवाह झाल्यानंतर नवविवाहिता पळून जात असताना पकडली गेली, त्यावेळी या फसवणुकीच्या प्रकाराचा भंडाफोड झाला. याप्रकरणी शहापूर पोलिसांत शनिवारी दाखल झालेला गुन्हा नंतर भुसावळ शहर पोलिसांत रविवारी वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी निकिता ऊर्फ जया रमेश भाई सोलंकी (वय ३२, कानोले, दर्यापूर) आणि तिचा पती विठ्ठल काकडे (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे. १६ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास भुसावळ न्यायालयाच्या परिसरात योगेश संतोष महाजन (२५, रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर) याचे लग्न निकिता ऊर्फ जया हिच्याशी नोटरी पद्धतीने लावण्यात आले. निकिता ही अविवाहित असल्याचे भासवण्यात आले. यावेळी अतुल गुर्जर, आशाबाई (कंडारी, भुसावळ) व विठ्ठल शामराव काकडे (पाळशी, सिल्लोड) हे उपस्थित होते. या लग्नासाठी योगेश महाजन यांच्याकडून १ लाख रुपये घेण्यात आले होते. मात्र, नवविवाहिता योगेश महाजन यांच्या घरी एक दिवसही न राहता पळून जात असताना पकडली गेली. तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी योगेश महाजन यांनी शहापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.