भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की,, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी – २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीजवळ डेबीट कार्ड होते. ते कार्ड पंजाब अॅण्ड सिंद या बॅकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे त्या बँकेत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाची विच्छेदन करण्यात आले असून हा मृतदेह त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी १० वाजेपूर्वी मनमीतसिंग गुरूप्रीतसिंग या प्रवाशाचा मृतदेह सापडला.
त्या व्यक्तीचा मृतदेह हा येथील ग्रामीण रूग्णालयात विच्छेदनासाठी रवाना केला असता विच्छेदनावेळी मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळा सुध्दा चिरल्याचे आढळून आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र नंतर मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस तपास करीत आहे.