Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यापीठाने दक्षिण भागाला संवादाची घातली साद
    जळगाव

    विद्यापीठाने दक्षिण भागाला संवादाची घातली साद

    editor deskBy editor deskOctober 8, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कोकणातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करुन उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने दक्षिण भागाला संवादाची साद घातली असून हा संवाद निरंतर वाढीला लागायला हवा असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.डॉ.एन.के.ठाकरे यांनी केले.

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या वर्षाचा दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मु. पो.झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेला शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रा.ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार देखील देण्यात आले.

    विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात झालेल्या या समारंभात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रूपये ५१ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा.ठाकरे म्हणाले की, गिरणा, पांझरा आणि तापीची ही माती सुपीक असून या मातीचा स्तर जसा कसदार आहे तसा या भागातील बुध्दीमत्तेचा स्तर देखील उत्तम आहे. त्यामुळेच कोकणातील सामाजिक संस्थेला हा पुरस्कार देऊन विद्यापीठाने संवादाची साद घातली आहे. या पुढच्या काळात एकत्र येऊन संवाद साधणे गरजेचे ठरले आहे. शिक्षणातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर आपोआप शिक्षणाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे श्रम मुल्याचे शिक्षण या विद्यापीठाने द्यावे. नव्या काळात मोठे बदल घडत आहेत. ज्यांची योग्यता आणि जो खरा संशोधक आहे त्यांना संशोधनासाठी वेळ देण्याची येऊ घातलेली व्यवस्था चांगली असली तरी ती चांगल्या रितीने राबविली जाईल का असा सवाल उपस्थित करुन प्रा.ठाकरे यांनी जागतिक पातळीवरील विद्यापीठांच्या रँकींगचे निकष बदलण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कायम गुणवत्ता जोपासली असून आरक्षण अत्यंत चांगल्या पध्दतीने राबविणारे हे देशातील पहिले विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले.
    पुरस्काराला उत्तर देतांना डॉ.प्रसाद देवधर यांनी या पुरस्काराची ५१ हजार रुपयांची रक्कम कोकणातील जिल्हा परिषद शाळेला देत असल्याचे सांगून हा पुरस्कार समाजाचा आहे असे सांगितले. धूर मुक्ततेसाठी विद्यापीठाने एखादे गाव निवडावे त्या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी भगीरथ मार्फत मदत केली जाईल. कारण बायोगॅस घराघरात उभारणे गरजेचे आहे. या देशात बायोगॅसची जाहिरात रस्त्यावर जेव्हा दिसेल तेव्हा इंडियातून आपण भारतात आलेलो असू असे ते म्हणाले. राजकीय व्यवस्थेकडे जायचे नाही, सरकारचा पैसा घ्यायचा नाही आणि कोणाकडेही भीक मागायची नाही ही त्रिसूत्री घेऊन भगीरथ संस्था २३ वर्षापासून उभी आहे. ग्रामीण विकास आम्ही सोपा करुन सांगतो. एखाद्या गावातील उत्पन्न २० कोटी होईल तेव्हा कोणीही गाव सोडणार नाही असे सांगून डॉ.देवधर यांनी भविष्यात कोकणातून मनीऑर्डर जाईल असा बदल निश्चितपणे घडवणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

    अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ साकारले आहे असे सांगून या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजचे आहे. त्यासोबतच आत्मचिंतनही केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा भगीरथ संस्थेला देत असतांना समाजाला हा भगीरथ पॅटर्न प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. पुरस्कार प्राप्त संस्था, प्राचार्य, शिक्षक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतांना भवतालचे बदल आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.

    प्रारंभी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा येाजनेचा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक प्रतीक कदम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वीणा महाजन व प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंचावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल व वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026

    भरधाव वाहनाचा कहर; २२ वर्षीय अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.