भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या ३१ वर्षीय विवाहितेचा पोलिस ठाण्याबाहेर विषप्राशनाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि २८ रोजी दुपारी घडली. विषप्राशनानंतर तत्काळ महिलेला उपचारार्थ दवाखान्यात हलविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झालेला होता. माया ललित फिरके असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांसह तिच्या पतीवर आरोप केले आहे.
बाजारपेठ पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, माया फिरके (वय ३१) आणि ललित फिरके असे दोघेही पती-पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. नुकतेच पाच महिन्यांपूर्वी माया फिरके यांचा ललित यांच्याशी मंदिरात दुसरा विवाह झाला होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. बाजारपेठ पोलिसांत त्यांनी यापूर्वी तक्रारी दिल्यात. माया आज दुपारच्या सुमारास माहेरी मलकापुरहून घरी परतली. तेव्हा पती ललित नांदवायचे नाही म्हणतो म्हणून दोघांत वाद झाला.
दोघे पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोघांची समजूत काढत तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर तो न्यायालयातून मिळेल, अशी समजूत घातली. पोलिस ठाण्याबाहेर पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. माया यांनी सोबत आणलेल्या बॉटलमधील विष प्राशन केले. काही मिनिटांतच त्या जागीच बेशुद्ध पडल्या. तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
सकाळी तिचा फोन आला होता. थोड्याच वेळात मृत्यूची बातमी आली. माझ्या मुलीला बळजबरीने विष पाजले आहे, असा आरोप महादू रायपुरे यांनी पोलिसांसमक्ष आक्रोश करताना केला. तसेच मलकापूर (ता. अकोला) येथे माहेर असलेल्या माया फिरके यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असताना आई-वडिलांसह भावाने मृतदेह पाहताच प्रचंड आक्रोश करत तिच्या पतीला शिवीगाळ करून संताप व्यक्त केला. मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी हजर पोलिस कर्मचारी रवींद्र पाटील यांच्याकडून माहिती घेत घटना घडलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याकडे आई-वडिलांनी प्रस्थान केल्याने शवविच्छेदन गुरुवारी (ता. २९) होणार आहे. सायंकाळी मृत माया यांचे वडील महादू रायपुरे यांनी पोलिस ठाण्यात जात पूर्ण हकिगत जाणून घेतली. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई होईल, असे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.