जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने निर्माण होणारे स्वयंअध्ययन साहित्य हे विद्यार्थ्यांची आकलन, अवलोकन आणि विश्लेषण क्षमता अधिक विकसित करणारे असावे अशी अपेक्षा कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वयंअध्ययन साहित्य विकसन कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रा.माहेश्वरी बोलत होते. ते म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रीत आहे. यामध्ये बहुविविधतेला महत्व देण्यात आले आहे. या धोरणात उच्च शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी येण्याचे प्रमाण ५० टक्के निर्धारित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा अभाव लक्षात घेता बहि:स्थ मधून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या विभागामार्फत जे स्वयंअध्ययन साहित्य निर्माण होणार आहे ते शिक्षकाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता वाढीला लागतील असे दर्जेदार साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे.
प्रारंभी या विभागाचे प्रभारी संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी प्रारंभी प्रास्ताविक करतांना ११ पदव्युत्त शिक्षणक्रमांतर्गत प्रथम आणि व्दितीय वर्षासाठीच्या ९५ विषयांचे स्वयंअध्ययन साहित्य विकसित होत असल्याची माहिती दिली. यावेळी बहिणाबाई चौधरी जीवन व अभ्यास या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन कुलगुरुंच्या हस्ते झाले. प्रा.मनीषा जगताप यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.