मुंबई : वृत्तसंस्था
दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आता संपला असून काल (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून शिंदे गट याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या’’ असं ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. तर ‘वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो’ असा टोला मनसेच्या संदीप देशपांडे यांनी लावला आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीवरून वाद सुरू होता. महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यानतंर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर काल झालेल्या सुनावणीत कोर्टाने महापालिकेविरोधात निर्णय देत ठाकरे गटासाठी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे हा शिवसेनेचा वारसा आहे असं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असून मनसेकडून आता शिवसेनेला डवचण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण भाजपशी युती करणार नसल्याचं मनसेने स्पष्ट केलं होतं. येणाऱ्या निवडणुकांत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता असून विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.