भुसावळ : प्रतिनिधी
कोणतेही कागदपत्रे न देता शैक्षणिक कर्ज हवे आहे का? अशी विचारणा करणाऱ्या जाहिरातीला प्रतिसाद देणे कल्याण येथील लेबर काॅन्ट्रक्टर मंगेश गुलाबराव वाडेकर यांना महागात पडले आहे. भामट्यांनी त्यांना कर्ज म्हणून चिल्ड्रन बँकेच्या नोटा दिल्या.
कल्याण पश्चिम भागातील साई शरमन वाडेकर राेडवरील रहिवासी मंगेश वाडेकर दाेन महिन्यांपूर्वी फेसबुकवर कर्जाची जाहिरात पाहिली. कुठलेही कागदपत्रे न घेता कर्ज मिळेल अशी ती जाहिरात हाेती. त्यांनी चाैकशी केली असता विकास म्हात्रे व राजेश पाटील नामक दोघांशी चर्चा झाली. वाडेकर यांना मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी १० लाखांच्या कर्जासाठी प्रतिसाद दिला. मात्र, रक्कम घेण्यासाठी भुसावळात यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते ३० ऑगस्टला कल्याण येथून कारने भुसावळात आले. तत्पूर्वी, भामट्यांनी त्यांना दहा लाख कर्जाच्या बदल्यात आम्हाला १ लाख रुपये रोख द्यावे लागतील असे सांगितले.
त्यानुसार प्रवासात वाडेकर यांनी पारोळा येथील स्टेट बँकेतून एक लाख काढले. ही रक्कम घेऊन ते मंगळवारी सायंकाळी भुसावळात रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले. तेथे म्हात्रे याने त्यांच्याकडून आधी रोख एक लाख रुपये घेतले. नंतर कर्जाचे १० लाख आहेत असे सांगून एक बॅग सोपली. त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी १ लाखांचे १० बंडल होते. मात्र, प्रत्येक बंडलवर वरील बाजूची ५०० रुपयांची प्रत्येकी एक नोट खरी, तर इतर सर्व नोटा चिल्ड्रन बँकेच्या होत्या. याप्रकरणी वाडेकर यांची ९५ हजारात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश भाेये तपास करत आहे.
भुसावळ येथून नाेटांची बॅग घेऊन सायंकाळी पाचला कल्याणकडे निघालेले वाडेकर सायंकाळी ७ वाजता पाराेळा येथे पोहोचले. तेथे त्यांनी त्यांच्या खात्यात भरण्यासाठी बँकेत नोटा दिल्या. मात्र, प्रत्येक बंडलवरील वरील एक नोट वगळता इतर नोटा चिल्ड्रन बँकेच्या असल्याचे उघड झाले. दहा लाखांपैकी केवळ पाच हजारांच्या खऱ्या नोटा होत्या.
पाराेळा येथे पाेलिसांना बँकेत बाेलावण्यात अाले. पाेलिसांनी वाडेकर, त्यांचा मुलगा व मुलाचा मित्र यांना पाेलिस ठाण्यात नेले. तेथून त्यांना त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे पाठवले. भुसावळ येथे वाडेकर यांच्या फिर्यादीवरून विकास म्हात्रे व राजेश पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, हा प्रकार उघड होताच बाजारपेठचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश भोये यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर लावलेल्या सीटीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात वाडेकर यांना दहा लाखांच्या नोटा देणारा फुटेजमध्ये आढळला. त्यानुसार तपास सुरू आहे.