

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरून परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मेहरून अक्स नगर येथील रहिवासी आसिम झाकीर बागवान यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आसिम झाकीर बागवान (वय ३०) हे आपल्या मित्रांसोबत मेहरून ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या कर्बला मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. मित्रांसोबत खेळत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यांची प्रकृती बिघडली. घटनास्थळी उपस्थित मित्रांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आसिम यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आसिम बागवान हे एका सोलर कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होते. कामाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.



