

भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कजगाव येथील तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भडगाव पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला धुळे येथून अटक करत आज कजगाव गावातून आरोपीची भडगाव पोलिसांनी धिंड काढली आहे.
कजगाव येथील जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २३) यांचा मुन्ना ऊर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून मुन्ना राजपूत याने जयेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जयेश हे कामावर जात असताना गोंडगाव-कजगाव रस्त्यावरील सोलर प्लांटजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याचे विरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता त्याचा शोध घेत त्याला धुळे येथून अटक करण्यात आली होती. याबाबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण न पसरता आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तार सिंग राजपूत याची आज कजगाव गावातून भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पो.हे.कॉ.नरेंद्र विसपुते, पो.ना मनोहर पाटील, पो.शि. दिपक पाटील, पो.शि.महेंद्र चव्हाण, म.पो.शि सोनी सपकाळे. यांनी धिंड काढली. याबाबत आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



