

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दाणा बाजारात वाहन लावण्यावरुन शुकवारी वाहन चालकांमध्ये वाद झाले होते. शनिवारी या वाहनचालकांच्या असोसिएशनची बैठक सुरु असतांना यात एका जणाने असोसिएशनच्या अध्यक्षांवर गावठी पिस्तुल रोखल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास दाणा बाजार परिसरात घडली. दरम्यान बैठकीत उपस्थित असलेल्यांनी संशयिताजवळील गावठी पिस्तुल हिसकावल्यानंतर संशयित तेथून पसार झाला. पोलिसांनी ते पिस्तुल हस्तगत केले असून संशयिताचा शोध सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दाणाबाजारात जिल्हाभरातून वाहन चालक व्यापाऱ्यांचा मालाची वाहतुक करण्यासाठी येत असतात. याठिकाणी ट्रान्सपोर्ट चालकांचे देखील वाहने लावलेली असतात. शुक्रवारी वाहने लावण्याच्या कारणावरुन वाहन चालकांमध्ये वाद झाले. दरम्यान, शनिवारी या वाहनचालकांच्या असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांसह वाहन चालकांची बैठक सुरु होती. या बैठकीत आलेल्या एकाने पदाधिकाऱ्यांसोबत वाद घालीत त्याजवळ असलेला गावठी पिस्तूल रोखून धरला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बैठकीत एकच खळबळ माजून गेली. दरम्यान, बैठकीत उपस्थितांनी गावठी पिस्तूल रोखणाऱ्याच्या हातातून पिस्तूिल हिसकावल्यानंतर संशयित तेथून पसार झाला.
पर्दाधिकाऱ्यांवर गावठी पिस्तुल रोखल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ते गावठी पिस्तुल ताब्यात घेतले असून संशयिताचा कसून शोध घेत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता गेल्या काही दिवसांपुर्वीच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवीगाळ केल्याच्या वादातून एकमेकांच्या घरासमोर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. या घटनांमधील संशयित अद्याप फरार असतांना आणि या घटनांची धग कमी होत नाही. तोच पुन्हा भर बाजारपेठत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गावठी पिस्तूल रोखल्यामुळे गुन्हेगारांना कायदा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे



