

पाचोरा : प्रतिनिधी
येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश काळे यांचे जळगावहुन पाचोऱ्याकडे येत असताना बिल्दी धरणाजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे पाचोऱ्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
समर्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष, आर. के. जिमचे संचालक तथा शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश प्रल्हाद काळे (वय ५८, रा. स्वामी विंग, रिंग रोड, पाचोरा) हे २८ नोव्हेंबरला दुपारी जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने त्यांची कार (एमएच- १९, इजी २२११) ने पाचोऱ्याकडे येत होते. दरम्यान, दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास बिल्दी धरणाजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट डाव्या बाजुच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात राजेश काळे यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, राजेश काळे यांचा मृत्यू झाल्याचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, दोन भाऊ असा परिवार आहे. राजेश काळे हे नेहमीच सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेत असत. त्यांच्या अपघाती निधनाने पाचोरा शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.



