

भुसावळ : प्रतिनिधी
खासगी कंपनीत नोकरी सांभाळत उच्च शिक्षणाची पदवी मिळविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या वरणगाव येथील नैतिकचा परीक्षेचा पेपर सोडवून घरी परतताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पहूर (ता. जामनेर) जवळ घडलेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नैतिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संत जगनाडे महाराज चौकातील रहिवासी नैतिक अशोक चौधरी (१८) बारावी पास झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पुणे येथे खासगी कंपनीत कार्यरत होता. नोकरीसोबतच पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सध्या सुरू असलेल्या परीक्षेसाठी त्याने कामावरून सुट्टी घेतली होती. परीक्षा देऊन तो दुचाकीवरून पुन्हा वरणगावच्या दिशेने घरी परतत असताना पहूरजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात नैतिक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही बातमी वरणगावला धडकताच शहरातील त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी जळगावच्या दिशेने रवाना झाले. तर, त्याच्या घरी ही बातमी कळताच आई-वडिलांना धक्काच बसला. मन सुन्न करणारी बातमी ऐकून आईने हंबरडा फोडला. अपघात झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला उपचारासाठी पहूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारांनंतर त्याला जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. काम आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर धडपड करणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



