

भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवर मध्यरात्री अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संदीप मधुकर बऱ्हाटे (वय ४१, रा. सरस्वती नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हॉटेल चेतनसमोर हा अपघात झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बऱ्हाटे हे मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील हॉटेल चेतनसमोरून पायी जात होते. याचवेळी तेथून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बऱ्हाटे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी ऋषभ सुरेश बहऱ्हाटे (रा. चोरवड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार जयेंद्र पगारे करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



