

पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी दिवसाढवळ्या घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले. हत्या प्रकरणात अवघ्या चार दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर ६ ते ७ जणांच्या टोळक्याने गोळीबार करून कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदारचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयीन परिसराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात शुभम सुभाष चव्हाण याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून मंदार मारुती किवळे याचे नाव समोर आले होते. या प्रकरणात तो कारागृहात होता. मात्र, अवघ्या चार दिवसांपूर्वीच जामिनावर त्याची सुटका झाली होती. बुधवारी न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आला होता. दुपारच्या सुमारास न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर दबा धरून बसलेल्या ६ ते ७ हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने पिस्तूल काढून गोळीबार केला, तर इतर हल्लेखोरांनी कोयते घेऊन मंदारवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली.
गोळीबार होताच मंदारने जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्याने डोक्याला हात लावून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि हातांवर कोयत्याने सपासप वार केले. या अमानुष हल्ल्यात त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारने स्वतःला सावरत पोलिसांच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ त्याला रिक्षातून रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी पिस्तूल टाकून दोन दुचाकींवरून पळ काढल्याची माहिती आहे. चार जण अॅक्सेस दुचाकीवरून, तर तीन जण अॅक्टिव्हावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात अक्षय चव्हाण (कथित सूत्रधार), बाब्या पवार, यानप्या, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण अशी सात संशयितांची नावे समोर आली आहेत. या संशयितांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, कटातील सहभाग आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक असणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाच्या गेटबाहेरच भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायालयात वकील, पक्षकार, नागरिक आणि विविध प्रकरणांतील आरोपींची सतत ये-जा सुरू असते. अशा संवेदनशील ठिकाणी सशस्त्र हल्लेखोरांनी थेट हल्ला करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात गुन्हेगारीला आळा घालण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे न्यायालयाच्या इमारतीला बॉम्बची धमकी, तर दुसरीकडे न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला, या घटनांमुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायदानाच्या मंदिराबाहेरच अशा प्रकारे रक्तरंजित हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय? हल्लेखोरांनी इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला कसा केला? आणि न्यायालय परिसरातील सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.



