

मुंबई : वृत्तसंस्था
कुर्ला पश्चिम भागातील फीनिक्स मार्केटसिटी मॉलमागील प्रमोद महाजन उद्यानात दिवसाढवळ्या ८ ते १० अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुण-तरुणीवर अमानुष हल्ला चढवला. शेजारील इमारतीतील रहिवाशाने या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ८ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी (२० नोव्हेंबर) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय तरुण आणि त्याची २१ वर्षीय मैत्रीण प्रमोद महाजन उद्यानात फिरायला गेले होते. दोघेही मोबाइलवर फोटो काढत असताना तिथे आलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने तरुणीवर अश्लील शेरेबाजी सुरू केली. तरुणाने या प्रकाराला विरोध करताच टोळक्याने संतापून त्याच्यावर हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि बेल्टने बेदम मारहाण सुरू केली.
तरुणाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणीच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी दोघांनीही उद्यानाबाहेर पळ काढला, या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सीसीटीव्ही तपासावे, महापालिका-पोलिसांना शहरातील सर्व उद्यानांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आवाहन केले.
घटनेचा थरारक व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच घाटकोपर पोलिसांनी पीडित तरुण-तरुणीचा शोध घेऊन त्यांची तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत ८ विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी ५ मुलांच्या पालकांना पोलिसांनी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



