

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात सुसरी शिवारात शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून प्रौढ शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अशोक बाबूराव पाटील (५५) आणि सरिता अशोक पाटील (४३, रा. सुसरी, ता. भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. कांद्याच्या शेतात निंदणीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांची पत्नी सरिता पाटील हे सोमवारी नेहमीप्रमाणे मजुरांसह शेतात काम करण्यासाठी गेले होते. सुसरी शिवारातील त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने ते काढण्याचे काम पती-पत्नी करीत होते. दरम्यान, शेतात तण काढत असताना अशोक पाटील यांचा खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. जवळच काम करीत असलेल्या सरिता पाटील यांनाही याच वेळी विजेचा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. शेतात काम करताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शेतातील विद्युत तार नेमकी कशामुळे खाली पडली आणि दुर्घटनेला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याबाबत अधिकृत तपासातून स्पष्टता येणे अपेक्षित आहे.
अशोक पाटील आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. त्यामुळे पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. साखरपुड्याच्या तयारीत कुटुंबीय व्यस्त असतानाच नियतीने घातलेल्या या घावामुळे कुटुंबाचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ज्या घरात काही दिवसांत मंगलकार्याची लगबग सुरू होणार होती, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून ग्रामस्थांकडून शोक व्यक्त केला जात आहे. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगापूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत. या घटनेप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे पुढील तपास करीत आहेत. शेतातील विद्युत तार खाली पडण्यामागील नेमके कारण काय होते, तसेच या दुर्घटनेला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याची चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावावर शोककळा पसरली असून पाटील कुटुंबाच्या दुःखात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.



