
एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आता जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर खोचक टीका केली आहे. “हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे” असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
“कोणी म्हणतं तुरुंगात जायचंय, जायचंय तुरुंगात तर तुरुंगात जाईन. माझं नेहमीच असं होतं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे”” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. आडवी उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि त्याच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करायचा असे जे प्रकार होत आहेत ते निषेधार्ह आहेत” तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असं म्हटलं आहे.
“ईडी आता घरोघरी पोहोचला आहे. नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागली, एटीएस लागलं… काय काय लागलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. तुम्हाला, कार्यकर्त्यांना सांगतो की, नाथाभाऊंनी येथे 40 वर्षे काम केलं आहे” असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जळगावातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. याच दाव्याचा पुनरुच्चार करत एकनाथ खडसे यांनी बंडखोरांवर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे.



