
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली. बोदवड चौफुली परिसरात केलेल्या या कारवाईत १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका २५ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर पोलिसांना ६ ऑक्टोबर रोजी बोदवड चौफुली परिसरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परिसरात वाहन तपासणी सुरू केली.
यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. HR-८४-१०७३) संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग करून वाहन थांबविले आणि तपासणी केली. वाहनाच्या झडतीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व जर्दा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
पोलिसांनी प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची ६ हजार ७५० पाकिटे, किंमत १० लाख १२ हजार ५०० रुपये, तसेच प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्द्याची ६ हजार पाकिटे, किंमत ५ लाख ७६ हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या प्रकरणी शुभमसिंग विद्ययाराम (वय २५, रा. निनावा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त केलेला गुटखा व पानमसाला नेमका कोठून आणण्यात आला होता, या अवैध वाहतुकीमागे मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत. नागरिकांना अवैध गुटखा, पानमसाला किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा वाहतूक आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र धनगर व प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.



