
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील तालुक्यातील गुणवडी शिवारात दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी आपल्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन उपचारांविना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आई-वडिलांनी मृतदेह शेतात नेऊन जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण प्रकाश लांडगे (वय अंदाजे 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील प्रकाश लांडगे आणि आई आशा लांडगे (रा. गुणवडी) यांना ताब्यात घेतले आहे, असे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले.
प्रवीणला दारूचे व्यसन जडले होते. तो आई-वडिलांसोबतच राहत असल्याने दारूच्या कारणावरून त्यांच्यात वाद होत असत. काही दिवसांपूर्वी प्रवीण दारू पिऊन घरी आल्यानंतर झालेल्या वादातून वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी आई-वडिलांनी त्याला घरातच ठेवले. अखेर दोन दिवसांनी उपचारांविना त्याचा मृत्यू झाला.
जखमी अवस्थेत असलेल्या मुलाचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. मुलगा मृत पावल्यानंतर आई-वडिलांनी हा प्रकार कोणालाही न सांगता रविवारी (ता. 4) पहाटेच्या सुमारास मृतदेह घरापासून 4 कि.मी. अंतरावरील स्वतःच्या शेतात नेऊन तिथे जाळून टाकला. दरम्यान, शेतात मानवी शरीर जळाल्याची कुणकुण लागताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे जळालेले अवशेष व हाडे आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आई-वडिलांनी खुनाची कबुली दिली असल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले आहे.



