
जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून ३० मे रोजी बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल पाच महिन्यांनंतर शोध घेतला. संशयित रविंद्र आवण चव्हाण याने अमिष दाखवून फूस लावून मुलीला सोबत नेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम राबविली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर संशयिताचा मोबाईल बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे आव्हानात्मक होते. मात्र, पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलगी व संशयित हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही तेथील एका शेतातील झोपडीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच तेथे मजुरीचे काम करीत असल्याचेही समोर आले. माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काष्टी येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. मुलीला चाळीसगाव येथे आणून वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर संशयित रविंद्र चव्हाण याची न्यायालयीन प्रक्रियेनंतर कारागृहात रवानगी करण्यात आली. तांत्रिक तपासामुळे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या शोधाला अखेर यश आले.



