
अमळनेर : प्रतिनिधी
रेशन दुकानातील धान्य पोलीस पाटलाच्या खाजगी गोदामात आढळल्याने नगाव खुर्द येथील दोन्ही भावावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना जमाल शेख यांनी १ रोजी रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, प्रमोदपुरी गोसावी हे नगाव बुद्रुक व नगाव खुर्द येथे दुकान क्रमांक १५२ व १५३ चालवतात. नगाव बुद्रुकच्या सरपंच सरिता गोसावी विपुल गोसावी, सागर गोसावी, रोहिदास वारुळे, मयूर बोरसे, सागर गोसावी यांनी तहसीलदारांकडे ३० सप्टेंबरला तक्रार केली की, रेशन दुकानदाराने रेशनचा साठा व शासकीय धान्य साठा हा त्यांचे भाऊ प्रवीण गोसावी यांनी बांधलेल्या खासगी गोदामात साठवला आहे. याबाबत नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, रुकसाना शेख, सचिन निकम, ग्राम महसूल अधिकारी सुधीर पाटील यांनी पंचांसमक्ष तपासणी केली होती.
त्यावेळी गोदामात २९ हजार ४३ रुपयांच्या २६ गोण्यांमध्ये १३.८३ विंटल मका, २५ हजार ३५३ रुपयांच्या १८ गोण्यांमध्ये ९.३९ विंटल ज्वारी, ७हजार ९५० रुपयांच्या ३ गोण्यांमध्ये १.५ क्विंटल साखर, २ हजार ४७० रुपयांच्या ३ गोण्यांमध्ये ९१.५०० किलोग्रॅम गहू आढळून आला. हा साठा जप्त करून शासकीय गोदामात जमा करण्यात आला आहे. तर, प्रमोदपुरी गोसावी आणि प्रवीण गोसावी यांनी शासकीय जादा धान्याची उचल करून खासगी गोदामात लपवून फसवणूक केली. त्यांनी धान्याचा अपहार केला म्हणून अमळनेर पोलीस ठाण्यात दोघा भावांविरुद्ध विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



