
जळगाव : प्रतिनिधी
पाळधी ते तरसोद बायपासलगत असलेल्या कचरा फॅक्टरी परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या ३५ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुर, कंजरवाडा) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई दि. १ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली असून त्याच्याकडून २ लाख १३ हजारांचे ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.
नशामुक्त भारत अभियानातंर्गत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक आणि सेवन वांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गोपनीय माहितीच्या आधारे संकलन करुन कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना पाळधी-तरसोद महामार्गालगत असलेल्या कचरा फॅक्टरी परिसरात सराईत गुन्हेगार एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक सोपान गोरे, विजय पाटील, सफौ अतुल वंजारी, अकरम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे यांचे पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषक मिलींद जाधव, गौरव पाटील यांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. संशयित अजय गारुंगे हा एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी कचरा फॅक्टरी परिसरात येताच सापळा रचून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ लाख ९३ हजार रुपये किंमतीचे ६४.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी अटक केलेल्या अजय गारुंगे याला याच्याविरुद्ध यापुर्वी एमडी ड्रग्जचे दोन गुन्हे दाखल असून तो बाहेरील जिल्ह्यातून ड्रग्ज आणून त्याची जळगावातील विविध भागात विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानुसार त्याला पुरवठा करणा-यांचा देखील पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. संशयित गारुंगे याच्याविरुद्ध एमडी ड्रग्ज आणि गांजा बाळगणे आणि त्याची विक्री करणे यासह अनेक ३५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गारुंगे हा एमडी ड्रग्जची त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार दोघ साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जात आहे.



