
जळगाव : प्रतिनिधी
गणपतीनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, चांदी-सोन्याचे दागिने, मोबाईल, कपडे व कॉस्मेटिक साहित्य असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन संशयितांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गणपतीनगरातील गुरुनानक हौसिंग सोसायटी परिसरात तुषार गोविंदा गायकवाड यांचे घर आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड हे संपूर्ण कुटुंबासह घराला कुलूप लावून अजिंठा रोडवरील सुरभी लॉन येथे खाटूश्यामच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दुसऱ्या दिवशी रात्री अडीचच्या सुमारास घरी परतले.
घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील ३९ हजार ५०० रुपये रोख, १० भार चांदी, ७ भारांचे चांदीचे ब्रेसलेट, ६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, कपडे, कॉस्मेटिक साहित्य आदी असा एकूण सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समोर आले.
याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास अधिकारी व पथकाला घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी उपलब्ध फुटेज तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांच्या नोंदी तपासून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील समीर हनीफ काकर (रा. तांबापुरा) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याच्यासोबत त्याचा साथीदार सचीन शंकर साळुंखे (रा. तांबापुरा) यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, समीर काकर याच्याविरुद्ध यापूर्वी १३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच तो नुकताच कारागृहातून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी न्यायालयातून पोलिस कोठडी मिळवून तपास केला. या तपासादरम्यान त्यांच्याकडून आतापर्यंत कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बेंटेक्स साहित्य, चांदीचे जोडवे आणि ५ हजार रुपये रोख, असा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीतील उर्वरित मुद्देमालाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि वारुंगसे, पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंगळे आणि मुकुंद गवते यांनी सहभाग घेतला. पोलिसांकडून या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



