
भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील दीपनगरजवळील कपिलवस्ती परिसरात बुधवारी दि. ३० सप्टेंबर पहाटे सुमारे ५ वाजता भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, चालक श्रीविलास जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, वरणगाव येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त ट्रकचा क्रमांक एमएच ०५ डीके ०६७४ असून, प्राथमिक माहितीनुसार हा ट्रक धुळे जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. कपिलवस्ती ही दीपनगरलगत महामार्गाच्या परिसरात असलेली छोटी वस्ती आहे. अपघातानंतर ट्रक वस्तीच्या दिशेने गेला असता तर मोठी दुर्घटना घडून
जीवितहानी होण्याची शक्यता होती.
मात्र सुदैवाने ट्रक वस्तीपासून दूर राहिल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दीपनगर-कपिलवस्ती परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महामार्गावरील वाहतुकीचा वेग, रस्त्याची स्थिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



