
जामनेर : प्रतिनिधी
सासरच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील एकुलती येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई देवानंद सकट (वय ३५) असे मवत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, जिजाबाई सकट यांना सासरचा जाच असह्य झाल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी असल्याने त्यांना तातडीने विहिरीबाहेर काढणे शक्य झाले नाही. पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसल्यानंतर तब्बल बारा तासांनी त्यांचा मृतदेहच बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी मयत जिजाबाई यांच्या आई इंदुबाई रघुनाथ चंदनशिव (रा. ढालसिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती देवानंद युवराज सकट व सासरे युवराज सुखदेव सकट यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयत जिजाबाई यांचे मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे करत आहेत.



