
अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाण पुलावरून पिता व पुत्री जाताना मोटरसायकल कठड्याला धडकल्याने पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.२७ रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील भूगु ज्योतिषी फर्मचे ज्योतिष विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (वय ४५) (रा. केशव नगर, अमळनेर) हे मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ बी.ई १०२९ ने मुलीसोबत शहराकडून घरी केशवनगर कडे जात होते. यावेळी प्रताप तत्वज्ञान केंद्राजवळ अज्ञात वाहनाचा कट लागल्याने त्यांची दुचाकी कठवड्यावर धडकली. त्यामुळे विजय भार्गव हे पुलावरून तत्वज्ञान केंद्राजवळ पडले. अपघातानंतर जखमी अवस्थेत बराच वेळ ते विव्हळत पडले होते. त्यांना डोक्याला आणि पोटाला गंभीर मार बसला होता. त्याच अवस्थेत प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबलकार व भार्गव यांची पत्नी तेथे पोहोचल्याने त्यांनी एपे रिक्षात टाकून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलवले परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली असल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार असून ज्योतिषकार पन्नालाल भार्गव यांचे ते पुतणे होते.
या घटनेचे दुर्देव म्हणजे विजय भार्गव हे पुलावरून पडल्यावर १० ते १५ मिनिटे जखमी अवस्थेत जागेवरच पडून होते. अनेक जण पुलावरून त्यांना बघत होते तर मुलगी रडत होती. शेवटी त्यांची पत्नी घरून पोहोचली व प्रविण डबेलकर यांच्या मदतीने रिक्षात टाकून दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कदाचित लवकर मदत मिळाली असती तर तातडीने उपचार होऊ शकले असते असेही काहींनी सांगितले.



