
रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील दोधा येथे पैशांच्या कारणातून एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधा) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या घरात सालदार म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाला धर्मा भिलाला (वय १९, रा. प्रकाश पाटील यांचा वाडा, दोधा, ता. रावेर; मूळ रा. नसिराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पाटील यांच्या घरी सालदार/घरगडी म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. ती त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करीत होती. पैसे दिले तरच पुन्हा नांदायला येईल, अन्यथा दुसरे लग्न करेल, असे ती सांगत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपीवर पैशांसाठी दबाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजता आरोपी घराच्या मागील बाजूने घरात शिरला. त्यावेळी घरात असलेल्या ललिताबाई यांचा आरोपीने स्वतःच्या बेल्टने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दागिने व कानातील दागिने काढून आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
घटनेनंतर आरोपीने काहीही घडले नसल्याप्रमाणे वावरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. दरम्यान, पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याचा शोध घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्याने लपवून ठेवलेले दोन गळ्यातील हार आणि कानातील दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेमुळे दोधा परिसरात खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, खून आणि चोरीमागील नेमका घटनाक्रम तसेच आरोपीचा उद्देश याबाबत तपास केला जात आहे.



