
जळगाव : प्रतिनिधी
पतीने मित्राला उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन गायत्री राजेंद्र पाटील (वय ३८, रा. निवृत्तीनगर) या महिलेच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. महिलेने आरडाओरड केल्यामुळे ही घटना खालच्या मजल्यावर राहणाऱ्या जेठाणीच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वार केल्यानंतर संशवित सतिष मोतीलाल शिंदे (वय ४३, रा. मयुर सोसायटी) बाला नागरिकांनी पकडून ठेवत बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले, ही घटना मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी निवृत्ती नगरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निवृत्ती नगरात गायत्री पाटील या वास्तव्यास आहे. त्यांचे पती राजेंद्र पाटील यांनी काही वर्षापुर्वी त्या परिसरात राहणाऱ्या त्यांच्या मित्र सतिष शिंदे याला पाच हजार रुपये उसनवारीने दिले होते. बरेच महिने झाले तरी सतिष शिंदे याने राजेंद्र पाटील यांनी दिलेले पैसे परत दिले नव्हते. दरम्यान, मंगळवार दि २२ सप्टेंबर रोजी गायत्री पाटील या घरी एकट्याच असतांना संशयित संतिष शिंदे हा त्यांच्या घरी आला. त्यावेळी गायत्री पाटील यांनी त्यांच्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्याचे सांगत शिंदे याच्याकडे पैशांची मागणी केली. त्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती गायत्री पाटील यांचे जेठ यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
गायत्री पाटील यांनी पैशांची मागणी केल्यामुळे त्यांच्यात वाद झाल्यानंतर संशयित सतिष शिंदे याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार ब्लेडने त्यांच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे गायत्री पाटील या रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळल्या. वार केल्यानंतर गायत्री पाटील यांनी आरडाओरड केली. यावेळी त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर राहणारे जेठ व जेठाणी बांनी तात्काळ वर जावून बघितले असता, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांनी घटनेची माहिती राजेंद्र पाटील यांना दिल्यानंतर ते देखील लागलीच पोहचले. त्यांनी जखमी गायत्री पाटील यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
वार केल्यानंतर संशयित सतिष शिंदे हा तेथेच उभा होता. परिसरातील नागरिकांनी पाटील कुटुंबियांच्या घराकडे धाव घेत संशयित शिंदे याला पकडून चोप दिला. तसेच घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचताच संशयित शिंदे वाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक सतिष शेवाळे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी पाहणी करीत घटना जाणून घेतली. सुरुवातीला संशयित हा मोबाईल चार्जीग करण्याकरीता त्याचा मित्र राजेंद्र पाटील यांच्या घरी आल्याचे पोलिसांना सांगत होता, तसेच घटनास्थळी धारदार चाकू देखील पडलेला होता पोलिसांनी तो देखील जप्त केला असून संशयित हा महिलेला मारण्याच्याच उद्देशाने आला असावा असा संशय पोलिसांकडून वर्तविला जात आहे.



