
जळगाव : प्रतिनिधी
गोडावूनच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून २५ रिकाम्या गॅस हंडी चोरुन नेल्या. ही घटना दि. १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिरसोली प्र. न. जवळील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या भारत गॅस एजन्सीमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील साईकृपा ग्रामीण वितरक भारत गॅस एजन्सी येथे मॅनेजर म्हणून संदीप लक्ष्मण सपकाळे (वय ३९) हे काम पाहतात. त्यांचे आकाशवाणी केंद्राजवळ गोडावून असून त्याठिकाणाहून गॅस हंडीचे वितरण केले जाते. दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गोडावून किपर राजेंद्र काळे यांनी गोडावून उघडले. दिवसभर त्यांनी काम करुन सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी गोडावूनमध्ये भरलेल्या २६८ गॅस हंडी व ४४२ रिकामच्या हंडी मोजून गोडावून बंद करुन घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास गोडावून किपर राजेंद्र काळे हे गोडावून उघडण्याकरीता आले असता, त्यांना गोडावूनच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. त्यांना चोरी झाल्याची शंका आल्याने त्यांनी गोडावूनमधील रिकाम्या हंडी मोजल्या असता, त्यातील २५ रिकाम्या हंडी मिळून आल्या नाही. चोरट्यांनी गोडावूनमधील २५ हजार रुपये किंमतीच्या २५ रिकाम्या हंडी चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर दि. १८ रोजी मॅनेजर संदीप सपकाळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



