
जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरातून बेपत्ता झालेल्या सहावर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी रात्री एका इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. बालक खेळत असताना बांधकामस्थळी असलेल्या खड्यात तो पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अदनान सलीम खान (६) असे मृत बालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो अमरदीप चौक परिसरातून बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास नेहरू चौकीसमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या खड्यात बालकाच्या चपला तरंगत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, खड्यात साचलेल्या पाण्यात अदनानचा मृतदेह तरंगताना दिसून आला.
माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्याला लागलीच वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे हलविण्यात आले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.



