
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल ४० दिवसांच्या अथक तपासानंतर छडा लावला आहे. या प्रकरणात त्यांचा सख्खा भाचा प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या कबुलीनंतर जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळून वृद्ध महिलेचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी वैजंताबाई अचानक बेपत्ता झाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने असल्याने घातपाताचा संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने LCB ने समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान १५० हून अधिक CCTV फुटेज तपासण्यात आले, तसेच विविध ठिकाणी तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. CCTV मध्ये वैजंताबाई आरोपी प्रशांतसोबत दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांच्या चौकशीत प्रशांतने दिलेल्या माहितीनुसार, मोठे कर्ज आणि पैशांची गरज असल्याने दागिन्यांच्या हव्यासातून त्याने मावशीला खोटे कारण सांगून भाड्याच्या कारमधून सोबत नेले. धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात फिरवल्यानंतर दि. ४ ऑगस्ट रोजी पहाटे धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ रुमालाने गळा आवळून तिचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर मृतदेह जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीत फेकल्याचे आरोपीने सांगितले. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी ४० दिवसांनंतर मृतदेह हस्तगत केला.
आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर व धुळे येथील सोनारांना विकल्याची कबुली दिली असून, उर्वरित दागिने फागणे परिसरात लपवल्याचे सांगितले आहे. चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
या प्रकरणात सुरुवातीला अपहरणासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खून व पुरावा नष्ट केल्याची कलमे वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.



