
जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून क्षितिज मनोज निदाणे (२०, रा. शनिपेठ, गुरुनानक नगर) या तरुणावर तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाच्या मानेसह पोटावर, छातीवर असे अनेक वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१२ ऑगस्ट) गुरुनानक नगरात घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज जप्त केले आहे.
गुरुनानक नगरातील क्षितिज निदाणे याचे परिसरातील काही तरुणांसोबत वाद होते. याच वादातून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी क्षितिजचा पाठलाग करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. शरीरावर जागोजागी वार झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निदाणे याच्यावर वार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी भेट दिली.



