
जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळुची ट्रक तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधुन मधुन चोरटी वाहतूक केली जात होती. शहरात दोन ठिकाणी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी जिल्हापेठ तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरुवारी सकाळी ५.५० वाजेच्या सुमारास खोटेनगरकडून हा ट्रक आकाशवाणी चौकाकडे जात होता. यासंदर्भात गोपनीय माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी आयटीआयजवळ हायवेवरील वाहनावर लक्ष ठेवले. संशयास्पद येणार ट्रक (एमएच ई ७३७२) दिसताच तो थांबविला. वाहनाच्या तपासणीत त्यात १४ हजार किमतीची सुमारे दोन ब्रास वाळु निदर्शनास आली. चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आणि परवानगी नसल्याचे समोर आले.
सुमारे ५० हजाराचा ट्रक, नऊ हजार किमतीचा मोबाईल, वाळू असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी जगदीश कोळी (वय ३२), पुरुषोत्तम सोनवणे (वय २०), दिनेश नन्नवरे तसेच प्रवीण बाविस्कर (सर्व रा. बांभोरी, ता.धरणगाव) यांच्या विरोधात महाराष्ट्र जमिन महसुल संहिता व पर्यावरण संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सफौ संजय सोनवणे हे तपास करीत आहेत.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून सुमारे तीन हजार किमतीची एक ब्रास वाळु भरुन तिची चोरटी वाहतूक केली जात होती. पिंप्राळा शिवारात हे वाळुचे ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ७५३८) व ट्रॉली जोडलेले दिसले. या वाहनाच्या तपासणीत पोलिसांना वाळु वाहतुकीचा चालकाकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उत्तम खैरे (वय ४१, रा. सावखेडा) याच्या विरोधात गौण खनिजे विकास व विनीमय अधिनियम, जमीन अधि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार जितेंद्र राजपूत हे तपास करीत आहेत.
बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळच्या दरम्यान दापोरी (ता. एरंडोल) शिवारात नदीपात्रातून डंपर (एमएच २१ बीएच २६३४) मध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीची वाळू भरुन चोरटी वाहतूक केली जात होती. तहसलिदार यांचे गस्तीवरील पथकाने हा ट्रक पकडला असता प्रकार उघडकीस आला. पथकाने डंपरसह पाच लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला असता चालकाने वाहन पळवून नेले. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार किरण पाटील तपास करीत आहेत.



