Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्यावरील छोट्या व्यवसायांसाठी मनसेचा आवाज; आयुक्तांची सकारात्मक ग्वाही !
    जळगाव

    रस्त्यावरील छोट्या व्यवसायांसाठी मनसेचा आवाज; आयुक्तांची सकारात्मक ग्वाही !

    editor deskBy editor deskSeptember 11, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गणपती, नवरात्रीच्या सणासुदीत अनावश्यक कारवाई होणार नाही; छोट्या हॉकर्सच्या पोटापाण्याचा प्रश्न सविस्तर चर्चेला..

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील रस्त्याच्या कडेला छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या हातगाडीवाल्या, फेरीवाल्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट महानगरपालिका आयुक्तांसमोर मांडला. गणपतीचे दिवस, नवरात्रीचा उत्सव आणि आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता या काळात छोट्या व्यावसायिकांवर अनावश्यक अतिक्रमण कारवाई करू नये, अशी मागणी मनसेने केली.

    रस्त्याच्या कडेला उभी असलेली आईस्क्रीमची छोटी गाडी, पाणीपुरीची हातगाडी, भाजीची टोपली, फळांची गाडी, चहा-नाश्त्याचा छोटासा व्यवसाय, फुलांची विक्री, पूजेचे साहित्य, खेळणी, सजावटीच्या वस्तू किंवा अन्य हंगामी वस्तूंची विक्री—हे केवळ अतिक्रमण म्हणून पाहता येणार नाही. त्या प्रत्येक छोट्या व्यवसायामागे एका कुटुंबाचा संसार आणि दोन वेळच्या पोटाची भाकरी जोडलेली आहे, हा मुद्दा मनसेने आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत ठामपणे मांडला.

    आज बेरोजगारीच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. अनेक तरुण आणि सामान्य नागरिकांनी मोठे भांडवल नसतानाही हातगाडी, टपरी किंवा छोट्या व्यवसायातून स्वयंरोजगार निर्माण केला आहे. कोणाकडे मोठे दुकान नाही, कोणाकडे मोठी आर्थिक ताकद नाही; मात्र स्वतःच्या कष्टावर चार पैसे कमावण्याची जिद्द आहे.
    या छोट्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरभाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे एखादी हातगाडी हटविणे म्हणजे केवळ रस्त्यावरील वस्तू हटविणे नाही; तर त्या गाडीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या उत्पन्नावर परिणाम करणे आहे, हा संवेदनशील मुद्दा मनसेने प्रशासनासमोर मांडला. विशेषतः गणपती आणि नवरात्रीच्या काळात फुले, पूजेचे साहित्य, प्रसाद, खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, फळे, खेळणी व विविध हंगामी वस्तू विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना काही अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची संधी असते. वर्षभर कष्ट करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांसाठी सणांचा काळ म्हणजे कमाईची महत्त्वाची संधी असते.

    त्यामुळे याच काळात अचानक कारवाई करून त्यांचा माल, भांडवल आणि रोजगार हिरावून घेऊ नये, अशी भूमिका मनसेने मांडली.

    आयुक्तांची स्पष्ट ग्वाही..
    मनसेच्या सविस्तर निवेदनाची आणि या सर्व मुद्द्यांची महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक दखल घेतली. गणपती, नवरात्री आणि सणांच्या दिवसांमध्ये छोट्या हॉकर्सना केवळ व्यवसाय करीत आहेत म्हणून अनावश्यक त्रास दिला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही आयुक्तांनी दिली. मात्र हॉकर्सनीही प्रशासनाला सहकार्य करून शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता अडवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा आणणे किंवा नागरिकांना गंभीर त्रास होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणे याला या ग्वाहीचा अपवाद राहील. अशा परिस्थितीत नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याचा प्रशासनाचा अधिकार कायम राहणार आहे.

    मनसेचे हॉकर्सना आवाहन :
    आयुक्तांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व छोट्या हॉकर्सना आणि रस्त्यावरील व्यावसायिकांना “व्यवसाय करा, पण शिस्तीत करा” असे आवाहन केले आहे.
    आपल्या व्यवसायामुळे रस्ता अडवला जाणार नाही, नागरिकांना ये-जा करताना त्रास होणार नाही, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच व्यवसायाच्या ठिकाणी कचरा, प्लास्टिक किंवा घाण टाकू नये. आपला व्यवसाय ज्या रस्त्यावर चालतो, तो रस्ता आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, ही जाणीव प्रत्येक छोट्या व्यावसायिकाने ठेवावी.
    मनसेची भूमिका स्पष्ट आहे. छोट्या व्यवसायांना संरक्षण हवे, पण त्याचबरोबर शहराची वाहतूक, स्वच्छता आणि नागरिकांची गैरसोय यांचाही विचार झाला पाहिजे.

    महानगरपालिकेने मोठ्या अतिक्रमणांवरही समान निकषाने कारवाई करावी; मात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकाला थेट अतिक्रमण करणारा समजून त्याचा रोजगार हिरावून घेणे योग्य नाही.

    रस्त्यावरची छोटी गाडी छोटी असते;
    पण त्या गाडीवर एका कुटुंबाचा संसार उभा असतो. अतिक्रमणाविरोधात कारवाई करा; पण रोजगाराविरोधात नाही. रस्ते मोकळे करा; पण कष्टकरी माणसाच्या हातातील काम हिरावून घेऊ नका. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा,चेतन पवार, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, बादशाह शहा, अल्ताफ शहा, राजेश मराठे, यांच्यासह असंख्य महाराष्ट्र उपस्थित होते..

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सलग दुसऱ्यांदा खासदार स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर जळगावच्या जनतेच्या विश्वासाला मानाची पावती

    September 11, 2026

    पहाटे अंधारात ‘चोरीच्या’ तयारीत बसला; पोलिसांची नजर पडताच उडवाउडवीची उत्तरे!

    September 11, 2026

    जळगावात ‘साधू’ बनून भामट्यांचा धुमाकूळ : वृद्धाची ७० हजारांची अंगठी लंपास !

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.