
जळगाव : प्रतिनिधी
चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून अंधारात लपून संशयास्पदरीत्या बसलेल्या २० वर्षीय तरुणास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याची कारवाई गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मजरे ते वाघळी रोडवरील वाघळी चौफुलीजवळ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघडली येथील प्रेमराज उर्फ मंगेश शिवाजी सोनवणे (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पो.हे.कॉ. संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक स.पो.नि. विजय माळी यांच्या नेतृत्वात विभागीय गस्त घालत होते. पथकात पो.हे.कॉ.संदीप पाटील, पो.कॉ. विजय पाटील व चालक पो.कॉ. नितीन कोळी यांचा समावेश होता. गस्तीदरम्यान गुरुवारी पहाटे ३.३० वाजता पथकाचे वाहन मजरे ते वाघळी रोडने जात असताना वाघळी चौफुलीजवळ अंधारात एक तरुण तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या बसलेला आढळला.
पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रेमराज सोनवणे याची अंगझडती घेण्यात आली. या वेळी त्याच्याकडून २ हजाराचा मोटरोला कंपनीचा मोबाईल, सुमारे २ हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रेमराज सोनवणे याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कारवाई केली आहे.



