
फत्तेपूर, ता. जामनेर : जामनेर आगाराची बस शेवगे पिंप्रीकडून जामनेरकडे येत असताना हिंगणे पिंप्री गावापुढे फत्तेपूरकडून हिंगणे पिंप्रीकडे जाणाऱ्या पिकअपला धडकली. यात पिकअप चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना १० सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली.
जामनेर आगाराची बस (एमएच – १४, बीटी- ३९२०) ही १० सप्टेंबरला सायंकाळी हिंगणे पिंप्री मार्गे जामनेरकडे येत होती. हिंगणे पिंप्री गावापुढे लक्ष्मण रूपचंद भारंबे यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या पिकअप (एमएच – १९, सीएक्स- १८६८) ला बसची धडक बसली. या अपघातात पिकअप चालक मंगल उत्तम नवघरे (रा. कापूसवाडी) तसेच हिंगणे पिंप्री येथील पांडूरंग लालमल काळे व काशिनाथ धोंडू गोपाळ हे गंभीर जखमी झालेत. त्यांना ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी जामनेर व तेथून जळगाव येथे हलवले. यात पीकअप चालक मंगल नवघरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात सदाशिव सुरता गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास स.पो.नि. अंकुश जाधव यांचे मार्गदर्शनात स. फौजदार प्रवीण चौधरी करत आहेत.
जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील मूल रहिवासी मंगल उत्तम नवघरे आणि हिंगणे पिंप्री येथील भीवराव सुरता गोपाळ यांचा भाचा आणि जावाई असल्याने कापूसवाडीसह हिंगणे पिंप्री गावात ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शोककळा पसरली होती. ग्रामस्थांनी हिंगणेफाटा ते हिंगणे पिंप्री दरम्यान असलेला अरुंद रस्ता व रस्त्याच्या दोघा बाजूंना असलेले झाडे, झुडपे, काटेरी जाळ्यांमुळे अपघात झाल्याचे अंदाज वर्तवून याबाबत या वेळी तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.



