Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सामाजिक वनीकरण कार्यालय ‘रामभरोसे’; शासकीय कर्मचारी नसलेल्या व्यक्तीकडे कार्यालयाच्या चाव्या!
    जळगाव

    सामाजिक वनीकरण कार्यालय ‘रामभरोसे’; शासकीय कर्मचारी नसलेल्या व्यक्तीकडे कार्यालयाच्या चाव्या!

    editor deskBy editor deskSeptember 9, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड | प्रतिनिधी

    बोदवड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय कर्मचारी नसलेल्या एका व्यक्तीकडे कार्यालयाच्या चाव्या देण्यात आल्याचा, तसेच त्याच्याकडून आवक टपाल स्वीकारून त्यावर कार्यालयीन शिक्का व स्वाक्षरी करून पोच देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील गोपनीय कागदपत्रे, अधिकृत शिक्के आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल सुरेश वराडे, रा. कुर्‍हा पानाचे, ता. भुसावळ असे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती यापूर्वी रोजंदारीवर काम करत असल्याचे सांगितले जाते. मात्र १ सप्टेंबरपासून तो कामावर नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

    दरम्यान, वनरक्षक राजेश सोणवणे यांचे काही काम असल्याने अमोल वराडे याला संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयात बोलावून चाव्या देऊन उपस्थित राहण्यास सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याच्याकडे कार्यालयाच्या चाव्यांसह कपाटाच्या चाव्याही असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

    विशेष म्हणजे, कार्यालयात आलेल्या आवक टपालाची पोच संबंधित व्यक्तीने स्वतःच्या नावाने व स्वाक्षरीने दिल्याचेही सांगण्यात येत आहे. कार्यालयीन शिक्का शोधून तो टपालावर मारणे, स्वाक्षरी करणे आणि पोच देणे, तसेच आवक-जावकचा कारभार हाताळणे, अशी कामे त्याच्याकडून केली जात असल्याचा आरोप आहे.

    शासकीय कर्मचारी नसताना अधिकार कुणी दिले?

    शासकीय कार्यालयातील अधिकृत कागदपत्रे स्वीकारणे, त्यावर कार्यालयीन शिक्का मारणे आणि पोच देणे यासाठी संबंधित व्यक्तीला नेमका कोणत्या आदेशाने अधिकार देण्यात आला? कार्यालयाच्या चाव्या आणि कपाटाच्या चाव्या त्याच्याकडे सोपविण्याचा निर्णय कोणी घेतला? याबाबत लेखी आदेश आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

    या प्रकारामुळे कार्यालयीन सुरक्षेबरोबरच शासकीय कागदपत्रांची गोपनीयता आणि नोंदवहीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.

    संगणक परिचालकाशी नाते असल्याचा दावा

    दरम्यान, कार्यालयात कार्यरत असलेल्या संगणक परिचालक पंकज विठ्ठल वराडे, रा. कुर्‍हा पानाचे, ता. भुसावळ यांचा अमोल वराडे हा नातेवाईक असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    कामांबाबतही चौकशीची मागणी

    बोदवड परिसरात सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये कथित अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे आरोप यापूर्वीही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या कामांमध्ये अमोल वराडे याचा कथित सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

    तसेच संबंधित व्यक्तीला सेवा पुरवठादार कंपनीकडून कामावरून कमी करण्यात आले असल्याचा दावा असूनही तो कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याची सध्याची अधिकृत भूमिका काय आहे, याबाबतही संबंधित विभागाने स्पष्टता देणे आवश्यक आहे.

    वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची अपेक्षा

    शासकीय कार्यालयात अनधिकृत व्यक्तीला प्रवेश, कार्यालयाच्या चाव्या, कपाटातील कागदपत्रे व अधिकृत शिक्का वापरण्याची संधी देण्यात आली असल्यास हा प्रकार गंभीर मानला जाऊ शकतो. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोदवड कार्यालयातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

    दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असून संबंधित अधिकारी व व्यक्तींची बाजू समोर आल्यानंतरच अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    मोबाईल हिसकावला अन् दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले!

    September 9, 2026

    घटस्फोटित पतीसोबतचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल; महिलेची बदनामी, शनिपेठ पोलिसात गुन्हा!

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.