
जळगाव : प्रतिनिधी
दुचाकीच्या डिक्कीतून पकडलेले एफेड्रीन या अमली पदार्थाचे गुजरात कनेक्शन समोर आले असून गांधीनगर येथील सॉफ्टवेअर अभियंता इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख (वय ३१, गांधीनगर, गुजरात) याने जळगावातील पेडलरला हे अमली पदार्थाचा पुरवठा केला होता. त्याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोग्यासाठी घातक असलेल्या एफेड्रीन या अमली पदार्थाचा १ किलो ९६३ ग्रॅम व गांजाचा २ किलो ११४ ग्रॅमचा साठा दुचाकीच्या डिक्कीत घेवून फिरणाऱ्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याला दि. ३१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण) याला अटक केले होते. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने हा साठा गुजरात येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ६ सप्टेंबर रोजी इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख याला गुजरातमधून अटक केले.
अटकेत असलेल्या इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख या न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या पूर्वी अटक केलेल्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल यालादेखील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली.जळगावातील नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याने एफेड्रीनचा साठा गुजरातमधून अभियंता तरुणाकडून आणल्याचे तपासात समोर आले. या पूर्वी पटेल हा गांजा, एमडी यांची तस्करी करीत होता, मात्र पहिल्यांदाच त्याने एफेड्रीनचा साठा आणला. अमली पदार्थाचा साठा आणताना खासगी वाहन न वापरता रेल्वे, बसचा तो वापर करत असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
एफेड्रीनचे गुजरात कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याचा पुरवठा करणाऱ्याला अटक केली. अटकेत असलेल्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल व त्याला पुरवठा करणारा अभियंता इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख यांची समोरासमोर चौकशी केली जाणार असून त्यातून अजून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



