
चोपडा : प्रतिनिधी
सण-उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चोपडा शहरात जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात DJ वाजविणाऱ्या चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या DJच्या आवाजाची कमाल तीव्रता तब्बल १२०.९ डेसिबल नोंदविण्यात आली.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात सण, उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
त्यानुसार ६ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीपूर्वी संबंधित मंडळे व आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे तसेच मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी अथवा DJ साऊंड सिस्टीमचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, मिरवणुकीदरम्यान रुपम ज्वेलर्स परिसरात मोहिणी DJ बॅन्डचा मालक सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ (वय ३७, रा. पंचशील नगर, चोपडा) हा मोठ्या व कर्कश आवाजात DJ साऊंड सिस्टीम वाजवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी संबंधित DJ चालकाला ध्वनी प्रदूषण थांबविण्याबाबत समज दिली. मात्र, त्यानंतरही DJ वाजविणे सुरूच ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष Testo कंपनीच्या Noise Level Measuring Instrumentच्या सहाय्याने DJच्या आवाजाची तीव्रता मोजली. या तपासणीत LEQ ११५.६ डेसिबल, LAF Max १२०.९ डेसिबल आणि LAF Min ११३.० डेसिबल इतकी ध्वनी तीव्रता नोंदविण्यात आली. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी तीव्रता आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित DJ चालकाविरुद्ध कारवाई केली.
विशेष म्हणजे मिरवणूक शांततेत संपल्यानंतरही संबंधित DJ चालकाने DJ वाजविणे सुरूच ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३, २९२, ३(५), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० मधील कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या DJ चालकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. धार्मिक, सामाजिक अथवा अन्य कार्यक्रमांसाठी परवानगी घेताना पोलिसांकडून घालण्यात आलेल्या सर्व अटी व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मोठ्या आवाजात, कर्कश पद्धतीने किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने DJ अथवा साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे जळगाव जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी तसेच मंडळे, मिरवणूक आयोजक आणि DJ चालकांनी पोलिसांना सहकार्य करून सण-उत्सव शांततेत, शिस्तीत आणि आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.



