
मुंबई : वृत्तसंस्था
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून शिक्षण अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतिप्रधान करण्याच्या दृष्टीने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन त्याच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे हे निर्देश दिले आहेत.
जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे तसेच शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दप्तराचे वजन कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे नेऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देण्यावरही शिक्षण विभागाने भर दिला आहे.
पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान विद्यार्थ्यांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीने शाळांनी नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पुस्तके, वह्या किंवा शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दररोजच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणि साहित्य दप्तरात ठेवता यावे, यासाठी प्रत्येक वर्गाचे ‘दप्तर वेळापत्रक’ तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी सर्व पुस्तके शाळेतून घरी आणि घरून शाळेत नेण्याची आवश्यकता राहणार नाही.
विद्यार्थ्यांना दररोज सर्व पुस्तके घरी घेऊन जावी लागू नयेत, यासाठी वर्गखोल्यांमध्ये सुरक्षित कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य शाळेतच सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास दप्तराचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना घरून जड पाण्याच्या बाटल्या आणण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी शाळांमध्ये स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून १० दिवस दप्तरविरहित शिक्षण आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाणार आहे. स्थानिक कारागीर आणि व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी तयार करणे, हस्तकला, कृषीविषयक उपक्रम तसेच स्थानिक व्यवसायांची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा समावेश आहे.
दप्तरविरहित दिवसांव्यतिरिक्त वर्षभरात विविध कृतिप्रधान दिवसांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. शिक्षण केवळ पाठ्यपुस्तक आणि वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता खेळ, प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
दप्तराचे वजन मर्यादित ठेवण्यासोबतच शाळांनी विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी कोणती पुस्तके आणि साहित्य आवश्यक आहे, याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षण अधिक आनंददायी आणि अनुभवाधारित करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. कमी ओझे, अधिक अनुभव आणि आनंदी शिक्षण’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील भार कमी करण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणातील आनंद आणि सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट या निर्देशांमधून स्पष्ट झाले आहे.



