
कोट्यवधींच्या काँक्रीट रस्त्यावर मोठमोठे तडे; निष्पापांचे जीव गेल्यानंतरही कारवाईची प्रतीक्षा
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव : पाळधी–तरसोद बायपासच्या कामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातानंतर संबंधित कंत्राटदार कंपनी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने निकृष्ट रस्ते कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
मात्र, पाळधी ते जळगाव या महत्त्वाच्या काँक्रीट रस्त्याची अवस्था पाहता आता दुसरा प्रश्न उपस्थित होत आहे—या रस्त्याच्या निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची?
अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या पाळधी–जळगाव मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे तडे व भेगा पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रस्त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
….कोट्यवधींचा रस्ता आणि काही महिन्यांतच तडे!
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे आयुष्य इतक्या कमी कालावधीत संशयास्पद पद्धतीने कमी होत असेल, तर या कामाची स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या बांधकामात वापरलेले साहित्य, काँक्रीटची गुणवत्ता, जाडी, बेस तयार करण्याची पद्धत, क्युरिंग, ड्रेनेज व्यवस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांची तांत्रिक देखरेख यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाळधी–तरसोद बायपासच्या प्रकरणात पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे “एकाच जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कामात निष्काळजीपणावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर दुसऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी का होऊ नये?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
…अपघातांनंतरही यंत्रणा जागी होणार कधी?
पाळधी–जळगाव मार्गावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावरील तडे, भेगा आणि वाहतुकीला निर्माण होणारा धोका पाहता संबंधित विभागाने केवळ डागडुजी न करता संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे.
रस्ता बांधला जातो तो नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी; काही महिन्यांतच त्यावर मोठ्या भेगा पडत असतील, तर जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
….‘राजकीय राजाश्रय’ चर्चेत; पुराव्यांसह चौकशीची मागणी
पाळधी परिसरातील संबंधित कंत्राटदाराला राजकीय पाठबळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चेची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाला का? कंत्राट मंजुरीपासून कामाच्या गुणवत्तेपर्यंत कोणाची भूमिका होती? कामाचे बिल कोणत्या गुणवत्तेच्या अहवालाच्या आधारे मंजूर करण्यात आले? या सर्व प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तसेच कंत्राटदाराने नही च्या अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ दिल्याचा आरोप होत असून , त्याचीही स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे
….आता कारवाई कोणावर?
पाळधी–तरसोद बायपास प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचा संदेश दिला आहे. त्याच धर्तीवर पाळधी–जळगाव रस्त्याच्या कामाचीही तांत्रिक तपासणी करून दोष आढळल्यास कंत्राटदार, संबंधित अभियंते, गुणवत्ता तपासणी करणारे अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई होणार का?
हा आता केवळ राजकीय प्रश्न राहिलेला नाही; हा हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेला रस्ता काही महिन्यांतच भेगाळत असेल, तर जनतेच्या पैशांचा हिशेब कोण देणार?
बायपासच्या ठेकेदारावर कारवाई झाली; आता पाळधी–जळगावच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित होणार का?
या प्रश्नाचे उत्तर मिळण्याकडे पाळधी, जळगाव आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



