
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, एका विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एम.आय.डी.सी., म्हाडा कॉलनी, जळगाव) हे शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्समध्ये असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी कासट यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ३३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना तातडीने तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंपी यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीमध्ये शहीदखान नजीरखान (वय २७, रा. युसूफ मेडिकलजवळ, गेंदालाल मिल, जळगाव), समीर खान मजीदखान (वय ३७, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी गेंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. यावेळी तिन्ही संशयित पोलिसांच्या हाती लागले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत गुन्ह्यातील सहभाग नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा किती तत्परतेने काम करत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत GPSI सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, पोकों अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.



