
नाशिक : वृत्तसंस्था
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या एकाच वेळी रस्त्यांची कामे, रिंगरोड आणि रुंदीकरण सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांना त्रास होतोय. त्यामुळे लोकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात. गिरीश महाजन आणि दादा भुसे इथेच राहत असल्याने त्यांना तर जास्त शिव्या खाव्या लागतात.”
“कोणतेही मोठे परिवर्तन करताना सुरुवातीला शिव्या खाव्याच लागतात. पण ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्र्यंबकेश्वरचा कॉरिडॉर उभा राहील, तेव्हा हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील आणि आपली तारीफ करतील. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दोन शिव्या खायची तयारी ठेवावी; फक्त आपले काम जनहिताचे आणि पारदर्शक असले पाहिजे.”



