
जळगाव : प्रतिनिधी
शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवार दि. २७ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये निखील सुनिल पाटील (वय ३४, रा. सदोबानगर) व राजन सुकलाल बारी (वय २८, रा. जुने जळगाव) या दोघांचा समावेश असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सदोबा नगरात राहणारे निखील पाटील हे एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला होते. गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते महामार्गालगत असलेल्या हॉटेल त्रिमुर्तीजवळ दुकानाचे गोडावून असून निखील पाटील हे दुकानातून गोडावूनमध्ये वस्तू घेण्याकरीता आले होते. याच वेळी सामान पॅकींग करणाऱ्या प्लास्टीकच्या पट्टीने त्यांनी गोडावूनमधील लोखंडी अँगलला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी निखील पाटील हे परतले नाही तसेच वारंवार कॉल करुन देखील ते प्रतिसाद देत नसल्याने दुकानातील कामगार हा गोडावून आला. त्याला निखील पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करुन निखील पाटील यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील जुने जळगाव परिसरात राहणारे राजन सुकलाल बारी (वय २८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी राजन बारी याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



