
जळगाव : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील पती पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना कळवले आहे.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील याना पंचनाम्यासाठी पाठवले. एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.



