Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
    Uncategorized

    पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    editor deskBy editor deskAugust 22, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पाण्याचा प्रश्न आता उद्याचा राहिलेला नसून तो आजचाच प्रश्न आहे. पाऊस किती आणि कधी पडेल हे आपल्या हातात नाही; मात्र पडलेले पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. पाणीटंचाईवर दीर्घकालीन मात करायची असेल, तर वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. जलसंधारण हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता लोकसहभागातून त्याला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
    जलसंधारण दिनानिमित्त जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपवनसंरक्षक सौरीश सहाय ,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री संतोष भोसले, कार्यकारी अभियंता श्री विनोद पाटील, श्री उत्तम दाभाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत राज्यातील जलसंधारणाच्या कामाला व्यापक दिशा दिली. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची प्रेरणा कायम राहावी, यासाठी त्यांच्या जन्मदिनी २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो.

    “आज ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होऊन पाण्यासाठी चालणारा प्रत्येक नागरिक या चळवळीचा खऱ्या अर्थाने भागीदार झाला आहे. आपल्या प्रत्येक पावलातून गावागावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ हा संदेश पोहोचला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

    शासनाने १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ आजचा कार्यक्रम झाला म्हणजे अभियान संपले असे न मानता गावागावातील नाले, तलाव आणि पाझर तलावांची स्वच्छता तसेच पाणी अडविण्याची व जिरविण्याची कामे लोकसहभागातून हाती घेतली पाहिजेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे अभियान प्रत्यक्ष कामातून प्रभावीपणे राबवावे. त्याचबरोबर नागरिकांनीही केवळ शासनावर अवलंबून न राहता आपल्या गावातील पाणी आपल्या गावातच अडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

    पाणी वाचविणे हा केवळ शेतकरी अथवा ग्रामीण भागाचा विषय नसून शहरातील प्रत्येक नागरिकाचीही तितकीच जबाबदारी आहे. विशेषतः तरुणांनी पाणी जपण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. “आजची वॉकेथॉन काही किलोमीटरवर संपेल; मात्र ‘पाणी वाचवायचे आणि पुढच्या पिढीसाठी जपायचे’ हा विचार इथे थांबता कामा नये. तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.

    ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून निर्माण झालेली जनजागृती गावागावात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामात रूपांतरित झाली पाहिजे. ‘पाणी अडवायचे, पाणी जिरवायचे, पाणी वाचवायचे आणि जळगाव जिल्हा जलसमृद्ध करायचा’ हा संकल्प प्रत्येकाने करावा आणि जलसंधारण अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारण व पाणी बचतीची शपथ देण्यात आली. महा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश पारधी यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

    August 22, 2026

    भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरातींवर अखेर मनपाची कारवाई

    July 28, 2026

    तापी नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरात शोककळा

    June 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.