
जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून ‘खेलो इंडिया संवाद – खेल की बात PM के साथ’ हा विशेष राष्ट्रव्यापी कार्यक्रम २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांनी दिली. यावेळी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एच. नारखेडे उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात हा कार्यक्रम डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव आणि श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भुसावळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात युवा, MY Bharat स्वयंसेवक, खेळाडू, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद असून, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा संवाद होणार आहे. देशभरातील सुमारे १,६०० ठिकाणांहून ८ लाखांहून अधिक युवा या उपक्रमाशी जोडले जाणार आहेत. क्रीडा, तंदुरुस्ती, युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर युवकांना राष्ट्रीय स्तरावरील संवादाचा भाग होण्याची संधी मिळणार आहे.
श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भुसावळ येथील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, रक्षा खडसे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत परिसरातील युवकांना युवा व क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच संवादाची संधी मिळणार आहे.
गेल्या १२ वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेला परिवर्तनशील विकास, आधुनिक क्रीडा परिसंस्था, क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, युवकांसाठी निर्माण झालेल्या नव्या संधी तसेच प्रतिभावान खेळाडूंची ओळख व त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नांवर या संवादामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
२०३६ ऑलिम्पिकसाठी भारतातील युवा क्रीडा प्रतिभा घडविण्यावर संवादाचा विशेष भर राहणार आहे. वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभावान खेळाडूंची ओळख करणे, आधुनिक प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सक्षम खेळाडू तयार करणे याबाबत युवकांशी विचारविनिमय करण्यात येणार आहे.
तसेच तळागाळापर्यंत उत्तम क्रीडा सुविधा पोहोचविणे, क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि क्रीडा क्षेत्रातील युवा सहभाग वाढविणे या विषयांवरही चर्चा होणार आहे. विकसित भारत, युवा आकांक्षा, युवा नेतृत्व, क्रीडा आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर युवकांचे विचार, अनुभव व सूचना जाणून घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



