
जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एकूण ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आहुजा नगर येथे राहणारे फिर्यादी मनोज शंकर गरुड यांच्या मालकीची एमएच-१९ डीडी-८३२३ क्रमांकाची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती. फिर्यादींचा मुलगा गरुड हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मोटारसायकल एमआयडीसी परिसरात उभी केली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजता काम आटोपून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेऊनही ती मिळून न आल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपीचे नाव मोहम्मद शाह अस्लम शाह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेतला. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच-१९ डीडी-८३२३), अंदाजे २५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली. तसेच चेसिस क्रमांक MBLHAR075HHL27654 असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल, अंदाजे २० हजार रुपये, आणि चेसिस क्रमांक MD2AI8AY1JWF06484 असलेली बजाज कंपनीची सीटी-१०० मोटारसायकल, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची, अशा एकूण तीन मोटारसायकली व ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी आणखी एक गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलिस हवालदार गिरीश पाटील, पोलिस हवालदार किरण चौधरी, पोलिस हवालदार प्रमोद लाडवंजरी, पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोळी व पोलिस कॉन्स्टेबल योगेश धुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या पथकाच्या तत्पर कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, चोरीच्या अन्य दुचाकींबाबतही तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



