शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न; तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन, मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : वसंत सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली वसंत सहकारी साखर कारखाना बचाव सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते, शेतकरी, कारखान्याचे सभासद, कामगार आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आक्रोश व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती गंभीर बनली. शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी उपस्थित शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वसंत सहकारी साखर कारखान्याचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन आणि सहकाराच्या माध्यमातून उभा केलेला हा कारखाना असल्याने, शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित जमिनींची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचा अधिकार कोणालाही नसावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
वसंत सहकारी साखर कारखाना हा केवळ उद्योग नसून परिसरातील हजारो शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी जोडलेला महत्त्वाचा आधार असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
कारखाना वाचवण्यासाठी शेतकरी, कामगार, सभासद आणि युवकांनी एकत्र येऊन सहकाराची ही संस्था पुन्हा सक्षमपणे उभी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कारखाना वाचवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या विविध स्तरांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वसंत सहकारी साखर कारखाना बचावासाठी शेतकरी आणि नागरिकांची एकजूट अधिक मजबूत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी उपस्थितांनी “वसंत कारखाना वाचलाच पाहिजे, शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राहिलाच पाहिजे!” असा निर्धार व्यक्त केला.



